राज्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात अजित पवार गटाचं 'वर्चस्व' दिसून आलं. त्यानंतर आता पुन्हा राज्य मंत्रिमंडळाच्या उर्वरित विस्तारात अजित पवार गटाला झुकतं माप देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यात अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद, दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला राज्यमंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान यावेळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) आमदारांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची प्रतीक्षा करत आहेत. तर महायुतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या प्रतीक्षेवर पाणी फिरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळाल्यानंतर शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे गटातील अस्वस्थता गेले काही दिवस वाढत चालली होती.
शिंदे गटातील भरत गोगावले ,संदीपान भुमरे यांच्यासह सरकारला पाठिंबा देणारे बच्चू कडू या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. शिंदे गटात मंत्री होण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्यानेच विस्तार रखडला होता. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता शिंदे गटाकडून एखादे नाव अचानक समोर येवू शकते. अजित पवार गटातून साताऱ्यातील मकरंद पाटील यांचे नाव चर्चेत आहे.