यवतमाळ : देशभरात लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरु आहे. याचदरम्यान देशातील बहुतांश भागात पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. या कडक उन्हातच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरु आहेत. अशाच एका भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. यवतमाळच्या पुसदमध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी हे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. यवतमाळच्या पुसदमध्ये अर्चना पाटील यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले. भाषणाच्या काही मिनिटानंतर गडकरी यांना भोवळ आली.
गडकरींना भोवळ आल्यानंतर स्टेजवरील कार्यकर्ते मदतीला धावले. त्यांनतर त्यांना स्टेजवरून उपचारासाठी बाजूला नेलं. भोवळ आल्यानंतर त्यांनी काही वेळ विश्रांती केली. त्यानंतर गडकरी यांची प्रकृती स्थिर झाली. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर गडकरी पुन्हा भाषणाला उभे राहिले.
दरम्यान देशाचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं विरोधकही कौतुक करतात, तर सोशल मीडियातून नेटीझन्सही त्याच्या कामाला दाद देत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या भाषणातील परखडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि भविष्याचं व्हिजन तरुणाईला भावतं.
दूरदृष्टी बाळगणाऱ्या नितीन गडकरींनी आजच्या यवतमाळ येथील सभेतून आपल्या कामाची ऊर्जा पुन्हा एकदा देशवासीयांना दाखवून दिली. हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेमधील तू न रुकेगा कभी.. तू न थकेगा कभी.. या पंक्ती गडकरींनी खऱ्या करुन दाखवल्या. कारण, भरसभेत भोवळ आल्यानंतरही ते पुन्हा भाषणासाठी माईकसमोर आले अन् उपस्थितांच्या टाळ्या-शिट्ट्यांनी लोकांचे मन जिंकले.
लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, बड्या राजकीय नेत्यांच्या सभांची रेलचेल महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमरावतीमध्ये आहेत. तर, राहुल गांधीही अमरावती व सोलापुरातून सभा घेत आहेत. दुसरीकडे नितीन गडकरीही महायुतीच्या उमेदवारांसाठी भर उन्हात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा हॅटट्रीक साधण्यासाठी लढत आहेत. त्यांच्यासाठी 20 एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारक म्हणून ते महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन मैदान गाजवत आहेत. दरम्यान, आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सभेत बोलताना व्यासपीठावरच त्यांना भोवळ आली.
नितीन गडकरी पुसदमध्ये भाषणासाठी उभा राहिले होते, त्यावेळी भाषण सुरु असतानाच भरसभेत त्यांना भोवळ आली.त्यामुळे गडकरींचा तोल जात असतानाचा पाठिमागून सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून आधार दिला. तसेच, स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरत व्यासापीठावर खाली बसवले. थोडावेळ आराम केल्यानंतर आणि पाणी पिल्यानंतर गडकरींनी पुन्हा आपलं अर्धवट भाषण सुरू केलं आणि उपस्थितांची मने जिंकली.