पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली. सासरच्या मंडीळीचा आधार राहील अशी अपेक्षा तिने केली मात्र हेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचं मोठं कारण ठरलं. तिच्यासोबत जे काही झालं ते धक्कादायक होतं. पीडित महिला यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील रहिवासी आहे. पती आणि एका मुलाच्या मृत्यूनंतर ती आपल्या दुसरा मुलगा आणि मुलीसह सासरच्यांकडे राहत होती.
महिलेची आर्थिक स्थिती हलाखीची होती आणि याचाच फायदा सासरच्या लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्यानं तिला रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मध्यप्रदेशात नेले. मात्र, तिथून तिला गुजरातमधील पोपट चौसाने नावाच्या व्यक्तीला तब्बल एक लाख वीस हजार रुपयांना गुजरातमध्ये विक्री करण्यात आले. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने तिचे दोन वर्षे शोषण केले. मुलगा जन्मल्यानंतर तिला गावी आणून सोडण्यात आले.
पीडित महिलेच्या आई-वडिलांनी त्यांची मुलगी आणि नातवंडांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार २०२३ साली दाखल केली होती. त्यानुसार आर्णी पोलिसांनी तपास सुरु केला. संबंधित महिला गावीच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आणि चौकशीत सर्व घटना उघड झाली. यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.