100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद
मुंबई : जमीन किंवा फ्लॅटच्या खरेदी विक्रीसाठी सध्या वापरात येणारे शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार आहे. या स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. त्यामुळे भविष्यात शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद होऊन फ्रँकिंग मशीनचाच वापर होईल, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विखे पाटलांनी बँक स्तरावर किंवा स्टॅम्प वेंडर यांच्याकडेच फ्रँकिंग मशिन कसे उपलब्ध करून देता येतील, याचा सध्या आढावा घेण्यात येत असल्याची माहिती दिली.
त्यामुळे प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत.
त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.