जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांनी हादरला आहे.चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या गोळीबारात जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. दरम्यान ही हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.
7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मात्र अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
गोळीबाराच्या या घटनेमुळे चाळीसगावात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालीय. सात पैकी पोलीस अजून एकाही आरोपीला अटक करु शकलेले नाहीत. फक्त या गोळीबारासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली. फक्त पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याच सांगण्यात येतय. चाळीसागाव पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विविध पथक तयार केली आहेत. पण अजून आरोपीला अटक झालेली नाही.