राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरुआहे. महाविकास आघाडी ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास अयशस्वी ठरले. त्यानंतर वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर वंचितकडून राज्यातील इतर मतदार संघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
आता या उमेदवारांच्या प्रचारासभा देखील सुरू झाल्या आहेत. अशामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांची आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा गंभीर आरोप केला. कल्याण, बीड, बुलडाणा अशा काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.