विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे तसेच पक्ष आणि पक्षांचे गट यांच्या विविध बैठका आणि दौरे सुरु आहेत दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा करण्यात येत असून बैठकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांची मागणी केली आहे. ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे 20 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.
दरम्यान , या बैठकीला आघाडीचे नेते उपस्थित आहेत. ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर दावा सांगितला आहे. म्हणजेच ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ 16 जागा देण्यास तयार असल्याचं दिसून आलं आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला होता. तर मुंबईत काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला फक्त प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.