महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. तसेच आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिली आहे. आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करुन देऊ, असं आश्वासन आणि ऑफर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो”, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे.
अजित पवार गटाने ही ऑफर स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं. पण हे कितपत शक्य आहे? ते आगामी काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.