१८०० कोटींचा जमीन घोटाळा सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. पुण्यातील१८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली, तसेच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे.
याप्रकरणात विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, या व्यवहाराशी माझा दुरान्वये संबंध नाही. 3-4 महिन्यांपूर्वीच मला अशी कुण कुण कानावर आली होती, तेव्हाच मी असलं काहीही केलेलं मला चालणार नाही, असे म्हटले होते. आता, याप्रकरणी राज्याचे मंत्री तथा महायुतीमधील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
पुणे जमीन प्रकरणात अजित दादांना जेव्हा कुण कुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवले असते तर असे झाले नसते. पण, त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात, असा चिमटा राज्याचे मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. तसेच, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, लवकरच सर्व समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, विरोधकांना काही काम उरले नसल्याने फक्त काहीही झाले तरी ते राजीनामा मागत असतात, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवरुन पलटवार देखील विखे पाटील यांनी केला आहे.