कर्जमाफी कधी ? CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांची माहिती
कर्जमाफी कधी ? CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांची माहिती
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : राज्याकडे एकीकडे भाजीपाला तसेच पिकाला मिळणारा कमी भाव यामुळे चिंतेत असलेला बळीराजा दुसरीकडे मुसळधार पावसामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. तर, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू, असे सांगितले होते.

 कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे नव्याने कृषि खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही म्हटले होते. धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं. एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं.आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे कृषी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील प्रयोगशील १३ शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. 

महायुतीतील विविध मंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केले आहे. त्यामुळे नक्की कर्जमाफी केव्हा होईल हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group