राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकरने ऐतिहासिक विभाज्य मिळवला असून आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आलं आहे. भाजप राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील राजकीय भूकंपाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व आपल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे. पुढे काय होणार ते आता बघुयात, अशा प्रकारचं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ऑपरेशन लोटसबाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “काँग्रेस पक्ष अस्वस्थ आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काही खोटारडेपणा केला, ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात मतं मिळाली. पण काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि खासदारांना वाटतं की, काँग्रेसमध्ये राहून पुढे त्यांना भविष्य नाही. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेटत असतात. त्यांचं दु:ख आमच्याकडे मांडत असतात. काँग्रेसचं नेतृत्व निवडून आलेल्या खासदारांना सांभाळण्यात कमी पडतंय. काँग्रेसचं आपल्याच खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे. पुढे बघू आता काय होतंय ते.”
तसेच, “काँग्रेसला त्यांची माणसं नीट सांभाळता येत नाहीत. आम्हाला ऑपरेशन लोटस करायची गरज नाही. हे मविआचे अपयश आहे. त्यांचेच लोक आम्हाला सांगतात की त्यांचे नेते भेटत नाही. निवडून आलेले लोकांना भेट देत नाहीत. मविआतील सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा लागतो. तिकडे एकदा निवडून आले की पाच वर्ष कोणी त्यांना विचारत नाही. निवडून आल्यानंतर लोकांसाठी कामं करावी लागतात, मतदारसंघातील लोकांना न्याय द्यावा लागतो. त्यासाठी जे पाठबळ लागतं, ते पाठबळ त्यांना मिळत नाही. त्यामुळे काही लोक पक्षावर प्रचंड नाराज आहेत,” असंही बावनकुळे म्हणाले.