''खेचाखेची तुटेपर्यंत ताणायची नाही'' ,उद्धव ठाकरेंचं  सूचक विधान
''खेचाखेची तुटेपर्यंत ताणायची नाही'' ,उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या असून आता राजकारणात  पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. दरम्यान , महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद टोकाला पोहोचला आहे. जागावाटपावरून ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यामध्ये जबरदस्त वाद पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीच्या बैठकीत यापुढे जाणार नाही, अशी जाहीर भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि ठाकरे गटात यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वादाबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरेंनीही काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जागांची खेचाखेची तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांना पटोले आणि राऊत यांच्यातल्या वादाबद्दल विचारलं, तेव्हा मी माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा जागांची खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अजूनही तंटा बखेडा झाला आहे, असं माझ्या कानावर आलेलं नाही. माझ्या कानावर येईल तेव्हा मी नक्कीच त्यावर भाष्य करेन. येत्या दोन-तीन दिवसात जागावाटप संपू शकतं’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते सक्षम नाहीत, ते यादी दिल्लीला पाठवतात, त्यानंतर चर्चा होते. आता वेळ निघून गेली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसंच आपलं महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला आणि मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं आहे आणि राहुल गांधींशी आपण बोलणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group