राज्यसरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरवातीपासूनच भरभरून प्रतिसाद मिळाला असला तरीही या योजनेवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. कधी हि योजना काही दिवसातच बंद पडणार अशी टीका होत होती तर काही वेळा ही योजना केवळ निवडणुकीसाठीच आणली गेली आहे. अशी टीकाही झाली. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजेनवर टीकास्त्र डागले आहे .
तर दुसरीकडे महायुती सरकारने सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बंद होणार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी भाष्य केले.
नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार नसून याउलट त्याचे पैसे वाढवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. जनतेचे पैसे हे जनतेला मिळायला हवे असेही त्यांनी सांगितले.
आमचं सरकार असताना सोयाबीनला 6 हजाराचा दर होता. तर, आता या सरकारच्या काळात 4 हजारही दर नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी राज्याच्या तिजोरीची लूट करत असून जनतेचा पैसा लुटला जात असा शाब्दिक वार नाना पटोले यांनी केला. महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसून गुजरातचा विकास करतात. आता हे आम्ही होऊ देणार नसल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, सध्याचे राज्यातील महायुतीचे सरकार हे इतर योजनांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी देत असल्याचा दावा त्यांनी केला.