राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम असून पक्षांचे प्रचार सुरु आहेत. या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, राज्यसरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच विरोधकांकडून या योजनेला जोरदार विरोधही झालेला आहे. तसेच, लाडकी बहीण योजना हा सध्या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरत असून, विरोधकांनी केलेल्या घोषणेनंतर आता एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी लाडक्या बहिण योजेनेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. मी जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो. सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, ज्या ठाकरे गटाने धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून आणला. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा आम्ही केलेली कामं तुमच्यासमोर आहेत, यांनी कामात खोडा घातला असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला, ते लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पळाले, पण कोर्टानं त्यांच्या थोबाडीत मारली. लाडक्या बहीणीचं दुःख त्यांना काय माहिती, ते म्हणतात आमचं सरकार आलं की सर्व योजनांची चौकशी लावू. या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायला तयार आहे.
तसेच, ते पुढे म्हणाले की , आम्हाला माहीत होतं आचारसहिता लागली की काळ मांजर आडवा घालणार. म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचा हप्ता देऊन टाकला. लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता भरणारं आमचं सरकार आहे. मात्र, पूर्वीच सरकार हप्ते घेणारं होतं. लाडक्या बहिनींना लखपती झालेलं बघायचा आहे, हेच आमचं आता स्वप्न आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.