सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या दुसऱ्या दिवसापासून महिलांमध्ये या योजनेचीच चर्चा पाहायला मिळतेय. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची सरकारी कार्यालयात एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं. त्यामुळे महिलां मध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत .
'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेच्या 1500 रुपयांचे 3 हजार करू, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार' असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. ज्याचं खाल्लं त्यासाठी जागलं पाहिजे, सरकार देत राहतं, पण सरकारला आशिर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा यांनी म्हटंलय. रवी राणा यांचं वक्तव्याने आता एकच खळबळ उडाली आहे.