लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावाच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत. राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात विद्यावेतनाचा पहिला हप्ता जमा होणार आहे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.
एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षार्थींच्या खात्यात प्रत्येकी ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन जमा केले जात असल्याची महिती लोढा यांनी मुंबईमध्ये दिली.
प्रत्येकाच्या खात्यात ६ ते १० हजार रुपये जमा होणार -
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिळणारे विद्यावेतन विद्यार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डीबीटी मार्फत ४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती लोढा यांनी दिली.
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली. या योजनेत आत्तापर्यंत ३ लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली. त्यातील १ लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले. १० हजार ५८६ अस्थापनांनी या उपक्रमात नोंदणी केली आहे.
एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या खात्यात प्रत्येकी ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन जमा केले जात आहे, असे लोढा यांनी सांगितले.
राज्यात ४१७ आयटीआय मध्ये १४६ आयटीआयचे नामांतर केले आहे. उरलेल्या आयटीआयसाठी काय नाव द्यायचे, हे लोकांनी सांगावे, असे आवाहन लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले.