बहुचर्चित माझीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनस सध्या राजकारणात घमासान आरोप प्रत्यारोप सुरु असून आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार , ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या महिलांना यापुढे योजनेचा लाभ आणि दरमहा मिळणारे 1500 रुपये आता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान , लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता केवळ 1 कोटी 66 लाख महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून त्यांच्या खात्यात दरमहा योजनेच्या लाभाची रक्कम जमा होईल. पण ज्या महिला अपात्र ठरल्या, त्यांचं काय ? त्यांना जी रक्कम इतके महिने देण्यात आली, त्याची वसुली होणार का ? असा सवाल अनेक महिलांच्या मनात आहे. मात्र यायाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या 81 लाख महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाले असून केवळ महिलांसाठी ही योजना असतानाही हजारो पुरूषांनी या योजनेचा लाभ घेत रक्कम लाटल्याचे समोर आले होते. त्यांना मात्र आता मोठा दणका बसणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची डेटाबेसद्वारे पडताळणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. थोडथोडक्या नव्हे तर 14 हजार पुरूषांनी महिलांच्या नावे अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत, पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यांच्यात़कडून मात्र लाटलेले हे पैसै आता पुरेपूर वसूल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पुरुषांना दणका बसणार असून शासकीय योजनेत गैरप्रकार करण त्यांना चांगलंच महागात पडणार आहे.