महायुती सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे, दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सोशल मीडियावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली. तटकरे यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.