राज्यात 'माझी लाडकी बहीण योजने'वरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर त्याला वारंवार सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. तर 'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत आणि टीका करत आहेत, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांनी लिहलं आहे की,"माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे.
परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे."
माझी लाडकी बहीण योजना टिकवणं अशक्य आहे असं विरोधक म्हणत आहेत त्यावर अजित पवारांनी अशक्य गोष्ट शक्य करणं ही माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?
आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
कोण असणार पात्र?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)