यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. परंतु, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासूनच एनडीए सरकार कोसळण्याबाबत दावे केले जात आहेत. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आता याबाबत मोठा दावा केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांपर्यंत विरोधकांनी हे एनडीए सरकार अधिक काळ टिकणार नाही, असे सातत्याने म्हटले आहे. यातच एका कार्यक्रमात बोलताना शेकाप नेते जयंत पाटील यांनी ढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा केला होता.
केंद्रात सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार
पुढील चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मीही इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे, असे शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.