निवडणुकींमध्ये राजकीय पक्ष आणि नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने देत असतात. दक्षिण भारतात मतदारांना भेटवस्तूंचे आश्वासन देणे काही नवीन गोष्ट नाही.
तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच भाजपाने जर राज्यात आपली सत्ता आली तर आपण तेलंगणाचं नामांतरण 'भाग्यनगर' असं करु असं आश्वासन दिलं आहे.
केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या शहरांची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे हैदराबादचेही भाग्यनगर करण्यात येईल. हा हैदर कोण होता? कुठून आला होता? अशा व्यक्तींच्या नावांची आपल्याला गरज आहे का?
आमची सत्ता आल्यास आम्ही हैदराबादचे नाव नक्की बदलू.’’ गुलामीची मानसिकता दर्शविणारी प्रतिके आणि नावे बदलण्यात कोणती अडचण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘‘भाग्यनगर या नावातच भरभराट आहे,’’ असे रेड्डी म्हणाले.