पुण्यातील दौंडजवळच्य कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. सोमवारी रात्री येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये एक तरूणी जखमी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये भोरचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावालाही अटक करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याची टीका केली होती. रोहित पवार यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरून स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
रोहित पवार यांची एक्स पोस्ट
दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत #अनंत_कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी.
दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दौंडमधील कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे होता.