महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड आज घडली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला होता. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
एकनाथ शिंदे नेमकं काय-काय म्हणाले?
“निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो. आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब पाहत आहोत. त्यात मी जात नाही. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात तसं मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी त्या धारणेत होतो. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे असं वाटत होत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. ही ओळख सर्व पदापेक्षा मोठी वाटते. मी समाधानी आहे. नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात सरकार आमच्या मागे उभे राहिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. की माझ्यामुळंकोणतीही अडचण होणार नाही हे मी मोदींना सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.