राज्यातील वातावरणात गेल्या दोन, तीन दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्याचे तापमान दहा अंशावर आले आहे. मुंबईतील तापमानात विक्रमी घसरण झाली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. काही शहराचे तापमान ८ ते १० डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. परभणीत निच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे राज्यात पाच दिवस थंडी राहणार आहे. पुण्याचे तापमान दहा अंशावर तर मुंबईचे तापमान १६ अंशावर आले आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होणार आहे. यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी निर्माण होणारे हे चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत श्रीलंकेचा किनारा ओलांडून तामिळनाडूच्या दिशेने जाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होणार आहे. राज्यात थंडीचा कडाका पाच दिवस असणार आहे.
दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे रुपातंर चक्रीवादळात होणार आहे. ‘फेंगल’ नावाच्या या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मयिलादुथुरई, तिरुवरूर, नागपट्टिनम, चेन्नई, तिरुवल्लुर, कांचीपूरम, चेंगलपेट आणि कडलोर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
यामुळे प्रशासनाने २७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तसेच २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.