राज्याच्या शासकीय रुग्णलयांतील मृत्यू तांडव सुरुच;
राज्याच्या शासकीय रुग्णलयांतील मृत्यू तांडव सुरुच; "या" जिल्ह्यात 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आली समोर
img
दैनिक भ्रमर

नागपूर (भ्रमर वृत्तसेवा) :- नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही 24 तासांत 25 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर राज्यातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातील अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला 1 हजार 401 अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे 1,800 खाटा आहेत. मेयो रुग्णालयात 822 खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण उपचार घेतात. दरम्यान, मेडिकलमध्ये 2 ऑक्टोबरला 24 तासांत तब्बल 16 आणि मेयो रुग्णालयात 9 रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत.

मेडिकलला दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी 8 रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु 24 तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. त्यामुळे खासगी रुग्णालये त्यांच्याकडचे मृत्यू कमी दाखवण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवत असल्याचे निरीक्षण येथील काही डॉक्टरांनी नाव न टाकण्याच्या अटीवर नोंदवले. मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषध रुग्णांना बाहेरून आणायला लावले जात असले तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या तुलनेत येथे औषधांचा तीन महिने पुरेल एवढा साठा आहे.

सर्पदंशासाठी आवश्यक इंजेक्शनसह इतर काही औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group