नागपूरच्या नवीन कटोल नाका टोल प्लाझाजवळ कालमेश्वर रोडवर स्कुटी, ट्रक आणि मिनी टेम्पोचा भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात इतका भयंकर होता की टेम्पोचा चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार , अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदत केली. जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला अन् वाहतूक कोंडी सुरळीत केली.
नेमकं काय घडलं ?
कालमेश्वरहून नागपूरकडे जाणारी स्कूटी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. यानंतर मिनी ट्रक आणि नवीन कटोल नाक्याकडून येणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूटीवरील दोन आणि मिनी ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातातील मृतांची नावे रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी आहेत. अपघात झालेले मालवाहू चार चाकीवाहन रविवारी संध्याकाळी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी उपज पोहोचून परत काटोलच्या दिशेने जात होते. एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अन् समोरून येणाऱ्या ट्रकला धडकले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.