नागपुरात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठं नुकसान; घरांमध्येही शिरलं पाणी, पहा काय परिस्थिती....
नागपुरात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठं नुकसान; घरांमध्येही शिरलं पाणी, पहा काय परिस्थिती....
img
Dipali Ghadwaje
नागपुर: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. दरम्यान काल मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे. 

नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. 

मध्यरात्री नागपूर शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. वाडीत ढगफुटीजन्य पाऊस कोसळल्यानं नागनदीला पूर आला आहे. नागनदीकाठी अनेक घरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. येथील गोड्या पाण्याच्या विहीरी पुराच्या पाण्यानं तुडुंब होऊन ओव्हर फ्लो झाल्या आहेत, परीसरातील सर्वांची दुचाकी आणि चारचाकी वाहनं तीन फुट पुराच्या पाण्यात डुबली. शनिवारला सकाळी चार ते साडे पाचपर्यंत विजांच्या भयावह गडगडाटीसह रेकाँर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे. 

दरम्यान नागपूरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणीकमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.


नागपुरातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट, म्हणाले...
नागपुरातील मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत."
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group