लातूर : नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं देशभरातली अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव यांची चौकशी सुरू आहे.
पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात आतापर्यंत फक्त जलील खा पठाण एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, लातूर पोलिसांना संजय जाधवला शोधण्यात यश आलं आहे.
राज्यातच नव्हे तर देशात सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलेलं. देशात गदारोळ घातलेल्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात येऊन पोहोचले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव इतर दोन अशा एकूण चार आरोपींची नावं समोर आली होती.
जलील पठाणला काल पोलिसांनी अटक केली होती. आज कोर्टासमोर हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. संजय जाधव या जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा शोध सुरू होता. पोलिसांनी संजय जाधवला अटक केली आहे. शिक्षक संजय जाधव याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे.