'नीट' पेपरफुटीचं धाराशिव कनेक्शन; आरोपी परिवारासह फरार
'नीट' पेपरफुटीचं धाराशिव कनेक्शन; आरोपी परिवारासह फरार
img
Jayshri Rajesh
देशातील शैक्षणिक क्षेत्रासह पालकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षांच्या घोळाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, लातूर जिल्ह्यातील कनेक्शन उघड झाल्यानंतर आता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात नीट प्रकरणाचं कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपशिक्षक संजय जाधव यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. 

 न्यायालयाने संजय जाधव यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे. दुसरीकडे अद्यापही दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.  

वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' पेपर फुटीप्रकरणातील आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे. 

आता याप्रकरणातील आणखी एक आरोपी धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यातील असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपी अटक आहेत तर दोनजण फरार आहेत. पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवार आणि गंगाधर याचा शोध सुरू आहे. यातील फरार आरोपी इरान्ना कोंगलवार हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआयमध्ये नोकरी करतो.

 तो मागील अनेक वर्षापासून लातूर शहरातील औसा रोड भागात राहत आहे. शनिवारपासून त्याच्या घराला कुलूप असून पत्नी आणि तीन मुलांना घेऊन तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवारचा शोध घेत आहेत. 

लातूरमधील मुख्याध्यापक निलंबित

नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलीलखाँ पठाण यावर जिल्हा परिषदेनं निलंबनाची कारवाई केली आहे. नीट पेपरफुटी  प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. जलीलखा पठाण हा लातूर जिल्ह्यातील कातपर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता, असं निलंबन आदेशात म्हटलं आहे. 

आरोपी मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई आणि अनास्था दिसून आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group