पंतजलीचे बाबा रामदेव आणि अचार्य बालकृष्णन सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. पतंजलीच्या जाहिरातीबाबत कोर्टाने त्यांना आज हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या फसव्या जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यामुळे या प्रकरणी आज पुढील सुनावणी पार पडत आहे.
नेमकं काय प्रकरण?
इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींवर अक्षेप घेतला होता. तसेच या जाहिरातींवरून त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. प्रत्येक फसव्या जाहिरातीमागे एक कोटी रुपयांचा दंड घेतला जाईल असा इशारा यापूर्वीच कोर्टाने दिला होता. मात्र तरीही जाहिराती थांबल्या नव्हत्या.
कोर्टाने निर्देश देऊनही जाहिराती न थांबल्यामुळे कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जाहीर माफी मागा असं सांगत कोर्टात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ फेब्रुवारी रोजी देखील यावर एक सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायालयाने पतंजलीच्या सर्व जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावरून बंद करण्यास सांगितले होते. ज्या प्रोडक्टची जाहिरात केली जात आहे, त्यात खोटे दावे केले जात आहेत. त्यामुळे या जाहिराती बंद कराव्यात, असं न्यायालयाने म्हटलं होतं. मात्र आता तसे न झाल्याने पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.