भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण -  रश्मी बर्वे
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण - रश्मी बर्वे
img
Dipali Ghadwaje
नागपूर : जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीत प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निकालाला स्थगिती दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. यानंतर रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. 

भाजपाच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागपुरातील भाजपाचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता, असा गंभीर आरोप रश्मी बर्वे यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे.

भाजपाचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूनं राहतो आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे मला त्या बड्या नेत्यांपासून मोठी अपेक्षा होती. पण, माझ्या प्रकरणात माझ्यावर अन्याय होत असताना भाजपाचा तो नेता आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे त्या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया रश्मी बर्वे यांनी दिली. 

यावेळी रश्मी बर्वे यांनी कोणाचेही नाव घेतलं नाही. दरम्यान, नैतिक वस्त्रहरण करणारा भाजपाचा तो नेता कोण? या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत धृतराष्ट्राची भूमिका बजावणारा भाजपा मोठा नेता कोण? रश्मी बर्वे यांचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group