मुंबई : साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करून एक महिन्यात बंद करून फरार झालेल्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आदित्य देशमुखचा अखेर शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरगंडा अरविंद कुमार असून तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरविंद कुमारनं एक नीट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं. तिथे एमबीबीएसमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक गोष्टही समोर आली आहे.
यामध्ये त्यानं एक कोटींपर्यंतची रक्कम लुटली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा हा सराईत गुन्हेगार असून या अगोदर त्याच्यावर हैदराबादेत 15 तर, बंगळुरूमध्ये एक गुन्हा दाखल आहे. मुंबईत देखील तो अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मिळत आहे.
नेमकं घडलंय काय?
मुंबईतील साकीनाका इथल्या वन एरोसिटी इथे नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशय निर्माण झाला आहे. अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा.लि असं या कंपनीचं नाव आहे. अरविंद देशमुख असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. मात्र काल अचानकही कंपनी बंद करुन मालक फरार झाला आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीच्या मालक फरार झाल्याने संशय निर्माण होत आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यात कोणतंही कारण न देता ही कंपनी बंद केल्यानं कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत, तसेच चौकशीची मागणीही करत आहेत.