कर्नाटक : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या हासन मतदारसंघातील जेडी (एस) खासदार प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, अश्लील व्हिडीओ लिक प्रकरणातील प्रज्वलचा माजी चालक बेपत्ता झाला आहे.
परदेशात असल्याने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्यासाठी प्रज्वलने आणखी सात दिवसांची मागणी केली आहे.
त्यावर २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची कोणतीही तरतूद नाही, असे परमेश्वरा यांनी सांगितले. प्रज्वल परदेशात गेल्याची माहिती मिळताच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही सर्व बंदरे आणि विमानतळांना त्याबाबत माहिती दिली आहे.
तसेच आमचे चौकशी समिती (एसआयटी) सदस्य आरोपीला वेळ द्यायचा की नाही याबाबत कायदेशीर मत घेत आहेत. २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्यामुळे एसआयटी त्यांना अटक करण्यासाठी पुढे जाईल, असे परमेश्वरा म्हणाले.