कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात पोलिसांकडून स्फोटकांनी भरलेली कार अडविण्यात आली आहे. मारुती स्विफ्ट ब्रँडच्या या कारमधून जिलेटिनच्या काठ्या, डिटोनेटर्स आणि वायर जप्त करण्यात आल्या आहेत. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. वाहन मालकाचीही चौकशी सुरू झाली असून शेख हजार शरीफ नावाच्या ३० वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना आंध्र प्रदेश-कर्नाटक सीमेवर घडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथक कर्नाटकातील कोलार येथे संशयास्पद वाहनांचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांना एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली.
गाडीला थांबण्याचा इशारा देताच चालक घाबरून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग केला असता काही अंतर गेल्यावर चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर कारची झडती घेत त्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली.
कोलार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम नारायण यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, कारमधून १२०० जिलेटिन स्टिक, ६ पॅकेट डिटोनेटर आणि ७ बॉक्स वायर जप्त करण्यात आले आहेत. फरार चालक तसेच वाहन मालकाची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी ३० वर्षीय शेख हजार शरीफ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून शेख हजर हे आंध्र प्रदेशच्या सीमेजवळील कर्नाटकातील मदनपल्ली येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी नांगली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.