नवी दिल्ली :- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका 17 वर्षांच्या मुलीच्या आईने सदाशिवनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी त्या महिलेने येडियुरप्पा यांनी तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.
त्यानंतर मध्यरात्री माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तर, कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली. जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. याआधी देखील अनेकदा येडियुरप्पा यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.