नवी दिल्ली : टेलिग्राम म्हणजे, भारतातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्रामचा युजरबेस फार मोठा आहे. मात्र, आता टेलिग्राम ॲपवर भारतातून बंदी येऊ शकते.
दरम्यान, टेलिग्राम ॲपवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पेपर लीकमध्येही टेलिग्राम अॅपचं नाव समोर आलं आहे. टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे, कारण विरोधकांनी पेपरफुटीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत पेपरफुटी प्रकरण आणि टेलिग्रामचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे.
टेलिग्रामचे संस्थापक अटकेत
फ्रांसच्या पॅरिस एयरपोर्टवरुन टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्स आणि रशियाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या 39 वर्षीय ड्युरोव शनिवारी (24 ऑगस्ट) अझरबायजानहून फ्रान्समध्ये उतरल्यानंतर पॅरिस-ले बोर्जेट विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारतातही इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस- टेलिग्रामचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आलं आहे.
टेलिग्राम आणि पेपर लीक प्रकरणाचं कनेक्शन काय?
सरकारनं टेलिग्राम ॲपची चौकशी सुरू केली आहे. तपासात आरोप खरे ठरले तर सरकार टेलिग्राम ॲपवर बंदी घालू शकतं. सरकार अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामची चौकशी करत आहे. अलीकडेच UGC-NEET वादात सरकार अडचणीत आलं आहे. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर लीकमध्ये टेलिग्रामच्या सहभागाबाबतही सरकारनं चौकशी सुरू केली आहे. टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून नीट परीक्षेचे पेपर 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत विकल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर टेलिग्रामवर दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.