टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये आज, शनिवारी होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
दरम्यान या सामन्यासाठी टीम इंडिया खूप मेहनत घेत आहे.एकीकडे खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत, तर दुसरीकडे चाहते संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. टीम इंडियाच्या विजयासाठी चाहते वेगवेगळ्या शहरात पूजा आणि हवन करत आहेत.
याशिवाय, वाराणसीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चाहते टीम इंडियाच्या फायनलमध्ये विजयासाठी प्रार्थना करताना दिसत होते. भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी वाराणसीमध्ये हवन केले. यावेळी चाहते मंदिरात क्रिकेट बॅट, भारतीय खेळाडूंचे फोटो आणि तिरंगा घेऊन उपस्थित होते.
टीम इंडिया गेल्या ७ महिन्यांतील दुसरी आयसीसी फायनल खेळणार आहे. याआधी २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये ही टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती, पण त्यांना १९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघाला २०२४ च्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी जिंकून आपल्या जुन्या जखमा भरून काढायच्या आहेत. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा विजेतेपदाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. स्पर्धेचा अंतिम सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाईल.
टीम इंडियाने सर्व सामने जिंकले
टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना भारतीय संघ एकही सामना गमावला नाही. प्रथम, रोहित ब्रिगेडने ग्रुप स्टेजमधील ४ पैकी ३ सामने जिंकले. एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर सुपर-८ मध्ये टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले. यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.