मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 5 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. या आगीमध्ये 43 जण जखमी झाले आहेत. या आगीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट असून तपास सुरु आहे. घटनास्थळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व लोकांना इमारतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आग विझवण्यामध्ये अग्निशन दलाच्या जवानांना यश आले आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. ही आग इतकी भीषण होती की आगीमुळे संपूर्ण इमारतच काळवंडली आहे. इमारतीमधून अजूनही धूराचे लोट बाहेर पडत आहेत. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत जवळपास २०० बेघर लोकं परवानगीशिवाय राहत होते.
जोहान्सबर्ग इमर्जन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवक्ते रॉबर्ट मुलाउडझी यांनी सांगितले की, अग्निशमन दलाचे कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. या आगीमध्ये एका मुलालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागलेल्या इमारतीत इतके लोक एकत्र असल्याने मदत आणि बचाव कार्यातही अडचणी येत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, इमारतीत 200 हून अधिक लोकं असण्याची शक्यता आहे. या इमारतीला अचानक आग कशी लागली यामागचे कारण समोर आले नाही. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. तरी देखील इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत आहे. इमारतीमध्ये असलेल्या काही नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीतून खाली उडी मारण्याचाही प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.