भारताला धक्का ! शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, 'या' खेळाडूकडे असणार कर्णधारपद
भारताला धक्का ! शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, 'या' खेळाडूकडे असणार कर्णधारपद
img
वैष्णवी सांगळे
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या पहिला कसोटी सामन्यात हरल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला असून आता दुसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. दरम्यान , दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. 

भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याला गुवाहाटी कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे.भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी दरम्यान गिलच्या मानेला दुखापत झाली होती. संघ व्यवस्थापन आणि वेद्यकीय टीमशी सल्लामसलत करून डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तो मुंबईला रवाना झाला आहे. गिलच्या अनुपस्थितीत अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा संघाचे नेतृत्व करणार आहे. तो सध्या संघाचा उपकर्णधार आहे.

२२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी गिलने शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) संघ सोडला आणि तो मुंबईला रवाना झाला. गिल १९ तारखेला संघासोबत गुवाहाटीला पोहोचला होता, पण २० तारखेच्या सरावात त्याने सहभाग घेतला नाही. गिल पुढील दोन-तीन दिवस मुंबईत विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर तो डॉ. दिनशॉ पारडीवाला यांच्याकडे उपचार घेईल, अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या फिटनेसबाबत अधिक स्पष्टता लवकरच येण्याची अपेक्षा आहे. सध्या तरी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.

संघ व्यवस्थापनाला अंतिम ११ खेळाडूंबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. युवा खेळाडू साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी हे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भारतीय संघ आता मालिका वाचवण्यासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group