टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. ऋषभ पंतला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाल्याने रिटायर्ड झाला होता. क्रिस वोक्सच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऋषभ पंतला दुखापत झाली.
यानंतर त्याच्या पायातून रक्तही आले. त्याला उभे राहणंही कठीण झाले. यानंतर पंतला रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पंतला डॉक्टरांनी सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. आता पंतच्या जागी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या संघात इशान किशनचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंतच्या जागी दुसरा कोणताही फलंदाज फलंदाजी करू शकणार नाही. ध्रुव जुरेल निश्चितपणे पंतच्या जागी विकेटकीपिंग करु शकणार, मात्र त्याला फलंदाजीसाठी परवानगी नसेल.
नेमकं काय घडलेलं?
सामन्याच्या 68 व्या षटकात ऋषभ पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतला ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारायचा होता, परंतु तो हा फुल टॉस बॉल पूर्णपणे चुकवल्याने चेंडू पंतच्या उजव्या बुटावर थेट लागला. पंतने त्याचा बूट काढला तेव्हा त्याला दिसले की थोडा रक्तस्त्रावही होत आहे. काही वेळाने त्याच्या पायावर सूज देखील दिसू लागली. तो चालण्यास असमर्थ होता, त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलावत पंतला रुग्णालयात हलवण्यात आले होते.