आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली. गेल्या ११ वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.
ही स्पर्धा राहुल द्रविडसाठी अतिशय खास होती. कारण मुख्य प्रशिक्षक म्हणून ही त्यांच्यासाठी शेवटची स्पर्धा होती. दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला आणि राहुल द्रविड यांना वर्ल्डकप ट्रॉफीसह निरोप दिला.
दरम्यान कर्णधार रोहित शर्माने राहुल द्रविडसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर राहुल द्रविडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोवर कॅप्शन म्हणून, ' प्रिय राहुल भाऊ, मी माझी भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधत आहे. पण मला खात्री आहे नाही की, मी ते करु शकेन. इतर अब्जावधी लोकांप्रमाणेच मी देखील लहानपणापासूनच तुम्हाला आदर्श मानले आहे. मात्र मी खरंच नशीबवान आहे, मला तुमच्यासोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही या खेळातील दिग्गज खेळाडू आहात. तुम्ही तुमचे सर्व यश आणि पुरस्कार बाजूला ठेवून आमच्या मुख्यप्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. तुम्हाला कुठलीही गोष्ट मनमोकळेपणाने सांगता आली.
तसेच त्याने पुढे लिहिले की, 'मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक आठवण आवर्जून लक्षात राहिल. माझी पत्नी तुम्हाला माझ्या कामातील जोडीदार म्हणते. एकच गोष्टं होती, जी बऱ्याच वर्षांपासून हवी होती. मला आनंद आहे की, ती गोष्ट आपण सोबत मिळून मिळवू शकलो. राहुल भाऊ, तुम्हाला माझा विश्वासू, माझा कोच आणि माझा मित्र म्हणण्याचा मला अभिमान वाटतो.'