भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकले होते. यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच चाहते हार्दिकच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता.पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियानं सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. यामध्ये ऑलराउंडर पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
पांड्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. अनुभवी अष्टपैलू असलेला हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे, हे केवळ देशानंच नाही तर संपूर्ण जगानं पाहिलं आहे. हार्दिक पांड्यानं अनेक मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. दरम्यान न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना पांड्या खेळू शकलेला नाही. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालं आहे.