विशाखापट्टणम येथे रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीच्या विजयात वॉर्नर, पंत, मुकेश आणि खलील अहमद यांचा मोठा वाटा होता. दिल्लीने हा सामना जिंकला असला तरी कर्णधार ऋषभ पंतला हा विजय चांगलाच महागात पडला आहे. खरेतर, स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या मीडिया रिलीझनुसार, ‘दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावला आहे. या हंगामातील संघाची ही पहिली चूक आहे. त्यामुळे पंतला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’
यंदाच्या हंगामात यापूर्वी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, ही चूक प्रथमच झाल्यास कर्णधाराला केवळ 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात येतो.
तर संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येते, यासह संघातील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारण्यात येतो.