मित्राची पोलिस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी ४ मित्र गेले होते. पार्टी करून घराच्या दिशेन परत येत असताना भरधाव कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातामध्ये ४ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. बालाजी शंकर माने (वय २७), दीपक दिलीप सावरे (वय ३० ), फारुख बाबू मिया शेख ( वय ३० ) आणि ऋतिक हनुमंत गायकवाड (वय २४) यांचा मृत्यू झाला. तर अजीम पाशामीया शेख (३०) व मुबारक सत्तार शेख (२८) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारही जण लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कारेपूर गावावर शोककळा पसरली आहे.
लातूरच्या कारेपूर गावातील तरुण अजीम पाशामिया शेख याची पुण्यातील दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. याचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील ६ मित्र कारने बीडजवळच्या मांजरसुंबा येथे गेले होते.
जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर- लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते. त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळापाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे