अत्यंत अशी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे.
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू झाला आहे. कार पलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चुरडा झाला आहे.

संभाजीनगरला राहणारे चव्हाण कुंटुंब हे गावी लातूरला जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात नुरवी चव्हाण ( अडीच वर्षे) आणि रोहिणी चव्हाण ( 30 वर्षे) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जखमींतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. गाडीचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणामुळे एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.