कोल्हापूरसह पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पर्यटक देखील आता वर्षा पर्यटनाकडे वळत असून नुकतीच पुण्यात पाण्याच्या प्रवाहात एक कुटुंब वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता कोल्हापुरात देखील नदीच्या प्रवाहात दोन युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चंद्रकांत कदम (वय वर्ष 18) आणि प्रतीक पाटील (वय वर्ष 22) दोघे राहणार निपाणी, जि. बेळगाव येथील रहिवासी असून वर्षा पर्यटनासाठी आले होते.
नेमकं काय घडले?
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे 13 जण वर्षा पर्यटनासाठी राधानगरी येथे आले होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पर्यटक काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदी येथे गणेश चंद्रकांत कदम हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला यावेळी तो बुडत असतानाचे पाहून त्याचा मित्र गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील (वय वर्ष 22) हा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला मात्र तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे. नदीला प्रवाह मोठा असल्याने या प्रवाहातून दोघांना बाहेर पडणे अशक्य झाले. यावेळी सोबत असलेल्या सहकार्यानी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीला तीव्र प्रवाह असल्याने दोघेही प्रवाहात वाहून गेले. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.