कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमुळे थांबलेल्या सहकारातील संस्थांच्या निवडणुकांची धामधूम आता पुढील महिन्यात दिसणार आहे. ग्रामीण भागातील राजकारण आता सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून ढवळून निघणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २९१ विविध संस्था, सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊनही थांबला होता. साधारण चार जूनला लोकसभा मतदानाची मोजणी झाल्यानंतर या सर्व निवडणुकांचा ‘जैसे थे’ असलेला कार्यक्रम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकांचे बिगुल वाजले होते. काही ठिकाणी माघार घेण्यापर्यंत निवडणूक कार्यक्रम पोहचला होता. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली होती. काही ठिकाणी मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन झाले होते, मात्र लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि या सर्व निवडणुकांची धामधूम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश झाले.
त्यामुळे जिल्ह्यातील सहकारातील २९१ संस्था, सेवा सोसायट्यासंह इतर निवडणुका थांबल्या होत्या. २८ फेब्रुवारी २०२४ पासून पुढे निवडणूक कार्यक्रम थांबले. त्याचवेळी ३१ मे २०२४ पर्यंत हे कार्यक्रम थांबविण्यात आल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अ, ब, क, ड वर्गवारीत ‘अ’ वर्गातील म्हणजे साखर कारखाने, बॅंका अशा कोणत्याही अती महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक थांबलेली नाही; मात्र ‘ब’ वर्गवारीतील ८७ संस्थांची निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन थांबली. तसेच ‘क’ वर्गवारीतील ७८ संस्थांची निवडणूक ‘जैसे थे’ आहे आणि सर्वाधिक म्हणजे ‘ड’ वर्गवारीतील १२६ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या थांबला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा पातळीवर तापलेले राजकारण पुन्हा एकदा गावपातळीवर तापणार आहे. जून महिना पावसाळ्याचा असल्यामुळे या काळात या निवडणुकांचा कार्यक्रम राबविला जाणार की, पुन्हा पुढे जाणार अशीही शंका आता उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे ज्या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता, ज्यांची प्रक्रिया सुरू होती त्याला ३१ मेपर्यंत स्थगिती दिली आहे. चार जूनला लोकसभा मतदानाची मोजणी आहे. त्यानंतर ‘जैसे थे’ आदेशावेळी ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया थांबलेली त्याच ठिकाणाहून सुरू होईल.
-निळकंठ खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकार