नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील पळसनजवळील हातरुंडी गावात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी व्याह्यानेच व्याह्याची हत्या केली आणि त्यानंतर बिबट्याने ही हत्या केल्याचा खोटा बनाव रचला.
नेमकं काय घडलं ?
गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ६५ वर्षीय देवराम नाना गावित हे शेतातील झापावर झोपले होते. यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे सांगून संशयित शिवराम गंगा गवळी गावात आला आणि ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ देवराम यांना पळसन आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याच्या तयारीत त्यांना घरी आणले. सकाळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगून संशयिताने वनविभाग आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावले. मात्र तपासणीदरम्यान शेतात बिबट्याचे पावलांचे कोणतेही ठसे आढळून आले नाहीत.
त्यामुळे ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला त्यांनी घराची झडती घेतली असता त्यांना भिंतींवर रक्ताचे डाग व काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडल्या. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचा दावा खोटा असल्याचे पोलिसांचे लक्षात आले आणि त्यानंतर मयताचा मुलगा हिरामण देवराम गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम गवळी यास सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.