७ सप्टेंबर २०२३
नाशिकरोड (प्रतिनिधी) :- एकलहरा गावाजवळील गंगावाडी येथे गुरुवारी सकाळी नर जातीचा बिबट्या पिंजर्यात अडकल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले; मात्र अजूनही काही बिबटे या भागात असून पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.
एकलहारा गावाजवळील गंगावाडी येथे काही दिवसांपासून बिबट्या दर्शन देत होता, रात्री अपरात्री डरकाळ्या मारून असल्यामुळे शेतकरी व नागरिक जीव मुठीत धरून राहत होते. येथील शेतकरी पाळीव प्राणी बिबट्याचे भक्ष्य नको होऊ म्हणून, घरात बांधून ठेवत होते. तेथील गावकर्यांनी वन वनविभागाकडे या भागात पिंजरा लावण्याबाबत आग्रह धरला. त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनअधिकारी अनिल आहेरराव, उत्तम पाटील व विजय पाटील यांनी पाहणी करून अरुण विश्राम धनवटे यांच्या गट 409 या उसाच्या शेताच्या बाजूला गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
गुरुवारी सकाळी पिंजर्यातून दिशेने डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला. गावकर्यांनी पाहणी केली असता पिंजर्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविल्यावर वन अधिकारी विजयसिंग पाटील, वनमजूर पांडू भोये व वाहनचालक अशोक खानझोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सात ते आठ वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याला रेस्क्यू करून त्यांनी गंगापूर येथील रोपवाटिका या ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले.
मागील काही दिवसांपासून नाशिकरोड भागात बिबट्याने हैदोस घातला होता. अनेक ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यातआले; मात्र बिबट्या त्यात अडकला नाही; मात्र एकलहरा गंगावाडी येथे बिबट्या पिंजर्यात अडकल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले, या भागात अजून बिबटे असण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Copyright ©2024 Bhramar