नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील जय भवानी रोड वरील मनोहर गार्डन मधील एका बंगल्यात बिबट्याने प्रवेश करीत पाळीव कुत्र्याचा फडशा पडला. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
महिन्यापूर्वी नाशिकरोडच्या आनंद नगर या भागात एका घरी जाणाऱ्या कामगारावर बिबट्याने हल्ला केला व त्याला जबर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर औटे मळा व लोणकर मळा व परिसरात बिबट्याने थैमान घातले होते. त्यानंतर वन विभागाने सुमारे पंधरा दिवस या भागात रात्री गस्त घालीत नागरिकांना सूचना केल्या. खोले मळा व लोणकर मळा याभागात पिंजरा लावण्यात आला. मात्र त्यानंतर बिबट्या न पिंजऱ्यात आला न कोणाला दर्शन दिले.
मात्र आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जय भवानी रोड येथील मनोहर गार्डन येथील "शरदा" बंगला मध्ये प्रवेश करून तेथील पाळीव कुत्रावर हल्ला करून त्या फरपटत बंगल्याच्या कंपाउंड वरून कुत्र्याला घेऊन गेला. त्यामुळे बंगल्याच्या आवारात सर्वत्र रक्त पडलेले दिसत होते.बिबट्याने बंगल्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
परिसरातील मनसे युवा नेते ऍड नितीन पंडीत व नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली.त्यानंतर मुख्य वनरक्षकअधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल उत्तम पाटील व सहकरी यांनी घटनास्थळी भेट दिली.
आर्टलरी सेंटर चा जंगल भाग जवळ असल्याने या भागात बिबट्याचा वावर आहे. अनेक बिबटे वन विभागाने या भागातून रेस्क्यू केले आहे.बंगला व इमारतीला पूर्णपणे कंपाउंड करून घेणे, संध्याकाळ नंतर लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, सकाळी व रात्री फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी हातात काठी,बॅटरी ठेवावी. असे आवाहन पाटील यांनी नागरिकांना देऊन समुपदेशन केले. नागरिकाच्या मनात बिबट्याने पुन्हा धडकी भरली आहे.या भागात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ऍड नितीन पंडीत व नागरिकांनी केली आहे.